कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लोक जिथे तिथे अडकले आहेत. राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले होते. अखेर लालपरी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी धावून आली आहे.
जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा ...

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 1780 विद्यार्थी राजस्थानच्या कोट्यात अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला परत आणण्यासाठी बंदोबस्त करावा अशी मागणी ते सतत करत होते. या संदर्भात कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या विद्यार्थ्यांचा विचार करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर, महाराष्ट्र आणि राज्यस्थान सरकारांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आता एसटी महामंडळाची जवळपास  100 गाड्या पाठविली जाणार आहेत, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. या गाड्या धुळे ते कोटा असा प्रवास करून तेथून विद्यार्थ्यांना घेऊन परत येतील. विद्यार्थी आणि पालकांना 14 दिवस घरी राहण्याची सूचना देण्यातयेणार आहेत. ‘मुलांना परत पाठविण्यासाठी राजस्थान सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे. दोन दिवसांत एसटी बसेस सोडण्यात येतील, 'असे परब यांनी सांगितले.





630 किमी प्रवास आणि दोन चालक


धुळे ते कोटा पर्यंतचा प्रवास सुमारे ६३० किमी आहे. एसटी कर्मचारी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सज्ज आहेत. एसटी बसमध्ये उपजिल्हाधिकारी, सहा एसटी अधिकारी, ब्रेकडाउन व्हॅन आणि आणखी दोन बस असतील.
प्रत्येक बससाठी दोन चालकांची नेमणूक करण्यात आली आहे. परिवहन महामंडळाने या वाहनचालकांना स्व-संरक्षणासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली आहेत. त्यात मास्क, सेनिटायझर्स समाविष्ट आहेत. यापूर्वी सर्व बसगाड्या सॅनिटाईझ करण्यात आल्या. मंदसौर, रतलाम मार्गे या बसेस कोटा (राजस्थान) येथे पोहोचेल. त्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना धुळ्यात आणले जाईल.

बऱ्याच दिवसांपासून परराज्यात शिक्षणासाठी गेलेल्या व लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा यामुळे आपल्या गावी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडला परतले


राज्य सरकारच्या परवानगीने अखेर बीड जिल्हा प्रशासनाने राजस्थानमधील कोटा येथे टाळेबंदीच्या वेळी अडकलेल्या 60 विद्यार्थ्यांना बीड येथे आणले. कोटा येथे अडकलेल्या बीड जिल्ह्यातील सुमारे 60 विद्यार्थी आज दुपारी अडीचच्या सुमारास शहरात दाखल झाले. खासगी प्रवासगाडीने त्यांना राजस्थानातून बीड येथे आणले. विद्यार्थी परत आल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.