लॉकडाऊनच्या कालावधीत रेड झोनमधून मोठ्या प्रमाणात परवानगी घेवून येणाऱ्या प्रवाशांसाठी जिल्ह्यात 13 ठिकाणी स्वॅब घेण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रादुर्भाव होवू नये यासाठी कागल तपासणी नाक्याजवळील कोव्हिड काळजी केंद्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 तास सेवा बजावत आहे.

बाहेरच्या जिल्ह्यांमधून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण 20 ठिकाणी तपासणी नाके आहेत. या नाक्यांमधून रितसर परवानगी घेवून येणाऱ्या प्रवाशांना नोंदणी करुन प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. जिल्ह्यामध्ये एकूण 41 ठिकाणी कोव्हिड काळजी केंद्र कार्यान्वित करण्यात आली असून 13 ठिकाणी स्वॅब कलेक्शनची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी दिली. कागल तपासणी नाक्यावर कोव्हिड काळजी केंद्र गेल्या दोन दिवसांपासून कार्यान्वित करण्यात आले आहे.

कर्नाटकमधून येणाऱ्या प्रवाशांना याठिकाणी तपासणीसाठी पाठविले जाते. सामाजिक अंतर राखून या सर्वांची बैठक सुविधा याठिकाणी करण्यात आली आहे. या प्रवाशांची सर्व नोंद घेण्यात येते त्याचबरोबर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्यांची ऑनलाईन नोंदणी केली जाते. यानंतर त्यांचा स्वॅब घेण्यात येतो. घश्यातून किंवा नाकातूनही स्त्राव घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. ताप उपचार क्लिनिकमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी जातात. त्यानंतर स्वॅब तपासणी अर्ज भरला जातो. हा अर्ज अपलोड केल्यानंतर ओटीपी प्राप्त होतो. त्यानंतरच त्यांचा स्वॅब घेण्यात येतो. हे सर्व स्वॅब येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. अहवाल निगेटिव्ह आल्यास संस्थात्मक अलगीकरणाचा शिक्का मारुन संबंधित गावच्या समितीकडे पाठविण्यात येते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास याठिकाणी संबंधिताला ठेवून त्याच्यावर उपचार केले जातात, असेही डॉ. साळे म्हणाले.

डॉ.सुनीता पाटील माहिती देताना म्हणाल्या, कर्नाटक सीमा भागातून कोल्हापूरमध्ये येणाऱ्यांसाठी कोगनोळी टोल नाक्या शेजारी हे कोव्हिड काळजी केंद्र उभं करण्यात आल आहे. संस्थात्मक अलगीकरणासाठी 40 बेडची सुविधा तर माईल्ड रुग्णांसाठी 12 बेडचे रुग्णालय केले आहे. जवळच असणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये 100 जणांची सोय करण्यात आली आहे. याठिकाणीही संस्थात्मक अलगीकरण करण्यात येते.

जिल्ह्याबाहेरुन जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसोबतच कोणताही प्रादुर्भाव जिल्ह्यात होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व पातळीवर कार्य तत्परतेने उपाययोजना केलेल्या आहेत. कागलमधील हे कोव्हिड काळजी केंद्र योग्य सुविधा देत असा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सज्ज आहे.

– प्रशांत सातपुते,

जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता