पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचे प्रयत्न यशस्वी

नंदुरबार दि.14 : गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील 1500 आदिवासी मजूर ‍श्रमिक एक्सप्रेसने नंदुरबारला परतले. या मजुरांना आपल्या गावी परत आणण्यासाठी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या 52 बसेसने त्यांच्या गावी पाठविण्यात आले.

याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या विविध भागातील हे मजूर  लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर या मजूरांकडून आपल्या मूळ गावी जाण्याची मागणी करण्यात येत होती. त्या सर्व मजूरांना आणण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्याचे  निर्देश पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन सचिवांना दिले होते. त्यांनी गुजरातमधील प्रशासनाशीदेखील संपर्क साधला होता.  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी या संदर्भात जुनागढ प्रशासनाशी समन्वय साधला आणि हे सर्व मजूर सुखरुप नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहोचले.

राज्यातील इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात अडकलेल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना परत आणण्यासाठी आदिवासी विभागामार्फत प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी न्यूक्लिअस बजेटमधून खर्च करण्याच्या सूचना प्रकल्प कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. आज 1500 मजूर आपल्या गावी पोहोचले याचे समाधान आहे. जिल्ह्यातील इतरही नागरिकांना परत गावी यायचे असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. – ॲड.के.सी.पाडवी, पालकमंत्री

बुधवारी रात्री  9.30 वाजता जुनागढ येथुन विशेष श्रमिक एक्सप्रेसने सर्व मजूर निघाले आणि गुरुवारी सकाळी 8.30 वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वेस्थांनकावर आगमन झाल्यानंतर 10 डॉक्टर व 10 आरोग्य सेवकांमार्फत बोगीनुसार प्रत्येक मजुरांचे थॅर्मल स्कॅनिंग करण्यात आले. त्यांच्या हातावर  होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन  त्यांची  नोंद घेण्यात आली.

सर्व मजूरांना तालुकानिहाय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत  52 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. मूळ गावी परल्यानंतर सर्व मजुरांना त्यांच्या घरी चौदा दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून श्री.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील सरीता ठाकरे या महिलेने काल रात्री श्रमिक एक्सप्रेसमध्ये मुलीला जन्म दिला. या महिलेला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून तिला मूळ गावी पोहोचविण्यात येणार आहे. बाळासह आपल्या गावी जाण्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.

आलेल्या प्रवाशांमध्ये अक्कलकुवा 27, तळोदा 253, धडगाव 22, नंदुरबार 80, नवापुर 7 आणि शहाद्यातील 1101  असे नंदुरबार जिल्ह्यातील 1490 प्रवासी होते. तर शिरपूर येथील 10 मजूरही याच रेल्वेने परतले.  मजुरांच्या तिकीटाचा खर्च  6 लाख 37 हजार 500 न्यूक्लिअस बजेटमधून करण्यात आला आणि  त्याची रक्कम जुनागढ प्रशासनाला देण्यात आली.

जिल्ह्यात सुखरुप पोहचलेल्या मजूराच्या चेहऱ्यावर अत्यंत आनंद दिसत होता. त्या सर्वांनी पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी तसेच शासन व प्रशासनाचे  विशेष आभार मानले .


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता