
विशेष रेल्वेने झारखंडचे दीड हजार कामगार रवाना
अमरावती, दि. १३ : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या झारखंडमधील १ हजार ४९६ कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्प्रेस आज सायंकाळी पाचच्या सुमारास अमरावती रेल्वे स्थानकावरून झारखंडमधील डालटनगंजकडे रवाना झाली. आपल्या घरी परत जाण्याचा आनंद मोठा आहे. अनेक दिवसांनंतर गावी जात असून नातेवाईक व मित्रांना भेटता येणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी विविध नागरिकांनी व्यक्त केली.
अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा डालटनगंजपर्यंत जाणार आहे. ही एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यातून १ हजार ४९६ प्रवासी नागरिक रवाना झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त श्री. सिंह व जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी प्रवाश्यांची विचारपूस करून त्यांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून व मास्कचा वापर ठेवून स्वत:सह इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
रेल्वेस्थानकावर प्रथमत: सर्व प्रवासी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. अमरावतीच्या नानकरोटी उपक्रमाच्या सहकार्याने प्रवासी बांधवांसाठी भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. नानकरोटी उपक्रमाकडून प्रशासनाला सातत्याने सहकार्य मिळत आहे. त्याबद्दल उपक्रमाच्या सर्व मान्यवर कार्यकर्त्यांचे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आभार मानले.
टाळेबंदीमुळे अडकून पडल्यामुळे घरी परतता येत नव्हते. मात्र, शासनाने आमची दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्ही अनेक दिवसांनी सुरक्षितपणे घरी परत जाऊ शकत आहोत. आमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना अनेक दिवसांनी भेटता येणार आहे. घरी परतण्याचा आनंद अवर्णनीय आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी विविध प्रवासी बांधवांनी व्यक्त केली.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होताच शासनाने विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या परतीचा मार्ग मोकळा केला आहे. जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना विविध प्रवास सुविधांद्वारे स्वगृही पोहोचविण्यासाठी नियोजन केले असून, सर्वांनी संयम ठेवावा. कुणीही पायी जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे.
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता