अमरावती, दि. १३ : येथील कोविड रूग्णालयातून उपचारानंतर बरे झाल्याने आणखी ११ जणांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ५६ वर जाऊन पोहोचली आहे.

आज घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये हबीबनगर येथील दोन पुरूष, हनुमाननगर येथील दोन पुरूष, शिराळा येथील चार पुरुष, बडनेरा येथील एक पुरुष व वरूड येथील दोन महिलांचा समावेश आहे. काल येथील जिल्हा कोविड रूग्णालयातून २४ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले, त्याचप्रमाणे, आज 11 रुग्ण घरी परतले.    

 रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला. मोठ्या संख्येने रूग्ण उपचारानंतर घरी परतत असल्याने ही बाब दिलासा देणारी ठरली असून, वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला.

जिल्ह्यात अद्यापपर्यंत ८४ रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२ व्यक्ती मयत आहेत. एक रुग्ण जीएमसी, नागपूर येथे रेफर करण्यात आला आहे. आतापर्यंत ५६ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १५ रुग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत.  

 कुणालाही लक्षणे दिसताच त्यांनी तत्काळ दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो. त्यामुळे माहिती लपवू नये, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता