कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली विलीगिकरण कक्षाची पाहणी

नाशिक दि.७ (जिमाका वृत्त) : सर्व जनता अडचणीत असतांना त्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात संवेदनशीलपणे काम करण्याची गरज आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून एकमेकांना मदत करून कामे करावीत, असे आदेश अन्न, नागरी  पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

येवला तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा येवला येथे अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, येवल्याचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले की, कोरोना विलगिकरण कक्षाची नियमित साफसफाई करण्यात यावी. त्यांना आवश्यक त्या सुविधा वेळोवेळी पुरविण्यात याव्यात. तसेच इतर आजारांचे निदान होण्यासाठी शहरातील खाजगी रुग्णालये सुरू ठेवावे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तपासणी अधिक वाढविण्यात यावी. लोकांना अत्यावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी दुकाने सुरू ठेवावी, याठिकाणी फिजिकल, सोशल  डिस्टन्सिचे  पालन होईल याची काळजी घ्यावी. पेट्रोल पंप वेळेनुसार सुरू ठेवण्यात यावे याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.

तसेच शहरातील कंटनमेंट झोनची पुनर्रचना करण्यात यावी. यासंदर्भात त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईच्या दिशेने येत असलेले कामगारवर्ग आपल्या गावाकडे पायी परतणाऱ्या लोकांना अडकवून ठेऊ नये तसेच त्यांना रस्त्यात आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आदेश मंत्री भुजबळ यांनी दिले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता