कोरोनामुक्त पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पत्नी सौ.नलिनी यांनी व्यक्त केला विश्वास

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आज जितका आरोग्य विभाग पुढे आहे, तितकीच पोलीस यंत्रणाही खंबीरपणे उभी आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय’या ब्रिदवाक्याला जागत आज लाखो पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. दुर्दैवाने त्यांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. पण तरीही ते न डगमगता खंबिरपणे सामोरे जात आहे. मुंब्रा (मुंबई) येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड (रा. नाशिक रोड) यांना देखील या लढ्यात कोरोनाची लागण झाली. मात्र हे संकट त्यांनी कसे पेलले याविषयी सांगताहेत त्यांच्या पत्नी नलिनी कड…

सर्व काही सुरळीत होतं…साहेब मुंब्य्राला…मी व दोघं मुलं नयन आणि मयंक नाशिकला होतो…साहेबांशी रोज फोनवर बोलणं होत असे… साहेब तेथे कोरोनाच्या बंदोबस्तात असतानाचे व्हिडीओ टिव्हीवर बातम्यांमध्ये दिसले… खूप अभिमान वाटला… तर दुसरीकडे मनात शंकेची पालही चुकचुकली… आणि एक दिवस साहेब अचानक नाशिकला आले… त्यांना थोडा अंदाज आल्यामुळे ते स्वत:हून तपासणीसाठी गेले… दाखल झाले… आणि आमच्या मनातली भीती खरी ठरली… साहेबांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले… रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असले तरी त्यांच्यासह आमचा पूर्ण परिवार कुठेही न डगमगता या संकटाला ‘पॉझिटीव्ह’पणे सामोरे गेला… मनाला हेलावून टाकणारे हे शब्द आहेत नुकतेच कोरोनामुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या पत्नी  सौ. नलिनी कड यांचे.

रीसर सील, पण माणुसकी मुक्त

कोरोनामुळे अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. कोरोना रुग्णापासून सावध राहिले पाहिजे. त्या परिवाराशी संपर्क न ठेवणे, समाजाचे दुश्मन समजून त्यांना एकप्रकारे वाळीत टाकणे, अजून बरेच काही. परंतू आमचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे नाशिकरोडचा परिसर सील होवूनही कुणीही आम्हांला टाळले नाही. ज्यांना ज्यांना कळत होते ते फोन करून धीर देत होते. ‘नलू…काळजी करू नकोस आम्ही गणपती पाण्यात ठेवला आहे’ तर कुणी सांगत होतं, ‘मॅडमजी, डरना मत हमने नमाज पठण करके दुवाँ मांगी है’, हे ऐकून आमचा आत्मविश्वास वाढत होता. मात्र समाजात असलेल्या गैरसमजाविषयी चिंताही वाटत होती.

सदरक्षणाय खलनिग्रणाय

साहेब, लवकर बरे व्हावेत म्हणून आम्ही त्यांना नाशिक आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईत हलविले. यादरम्यान खाकी वर्दीतील पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. त्यात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, व आमचे कौटुंबिक संबंध असलेले नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी खूप धीर दिला. पोलिसातील माणसासाठी पोलिसातलाच माणूस धावून आला, हे पाहून माझ्या मनात पोलीस खात्याविषयीचा आदर आणखीनच वाढला.

फुलांच्या वर्षावाने आला गहिवर

साहेब कोरोनामुक्त झाल्यावर पोलिसांनी केलेल्या फुलांचा वर्षाव पाहून त्यांना भरून आलं होतं. आपल्या नवऱ्यावर प्रेम करणारी माणसे पाहून मला खूप अभिमान वाटला. या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला असं वाटलं पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि त्यासह इतर सरकारी यंत्रणेला या लढ्यात असेच यश मिळो.

शारीरिक स्वास्थाचाही वाटा मोठा

आमचे संपूर्ण कुंटूब योगा, मेडिटेशन, जीम रोज करीत असते. फिटेनसवर आमचा भर असतो. साहेब मुंबईला जरी असले तरी त्यांना या सर्व गोष्टींची मी आठवण करून देत असते. तसेच आम्ही दोघे मॅरेथान स्पर्धेत दरवर्षी सहभागी होत असून, त्यात यशस्वी देखील होत असतो.  या सर्व फिटनेसचा शंभर टक्के फायदा कोरोनाशी लढताना झाला, असे नलीनी कड यांना सांगितले.

देशसेवा हेच आद्य कर्तव्य

आज हजारो पोलीस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर आहेत. रोज त्यातील अनेकांना बाधा होत आहे. मालेगावात तर ४० पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. पण असे असले तरी खाकी वर्दीतला पोलीस मागे हटलेला नाही. इतरांच्या परिवारासाठी पोलीस आपल्या परिवाराला सोडून सतत रस्त्यावर उभा राहतो. कोरोनाच्या लढ्याविषयी जेव्हा जेव्हा बोलले जाईल तेव्हा महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याची नक्कीच दखल घेतली जाईल, असेही नलीनी कड मोठ्या अभिमानाने सांगतात.

संकलन व शब्दांकन – मोहिनी राणे-देसले, माहिती अधिकारी, नाशिक


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता