महाराष्ट्रातील संत एकनाथ

संत एकनाथांचा जन्म शके 1426 ( इसवीसन 1504) मध्ये झाला तर काही विद्वानांच्या मते त्यांचा जन्म शके1455 मध्ये झाला आहे असे म्हटले जाते. संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते तर आईचे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथ हे दत्तभक्त जनार्दन स्वामींचे शिष्य असून ते देवगिरी येथील होते. एकनाथी भागवत हा एकनाथांनी लिहिलेली एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक असून संत एकनाथांनी त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. त्यांनी चतु:श्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, एकनाथी भागवत, भावार्थरामायण यासारख्या अति उत्कृष्ट ग्रंथांची रचना केली आहे. संत एकनाथ महाराजांचा जन्म आणि निर्वाण हे दोन्ही पैठण येथे असून त्यांची समाधी फाल्गुन वद्य षष्ठी शके 1521 ( इसवीसन 1599) घेतली आहे.

संत एकनाथांनी ज्ञानेश्वरी मधील शुद्ध-अशुद्ध पाठांची चिकिस्ता करत ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली आहे. सध्या वारकरी संप्रदायात असणारी प्रत एकनाथ महाराजांनी तयार केलेली प्रत वापरली जाते. तसेच एकनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा ही जीर्णोद्धार केलेला आहे. संत एकनाथ महाराजांनी जातीभेदावर प्रहार करण्याचे कार्य केले आहे. संत एकनाथांनी जोहरावरील अभंग यामधून जातिभेद विरोधी दृष्टिकोन स्पष्ट केले आहेत. संत एकनाथांची भारुडे आणि गवळणी प्रसिद्ध आहेत. त्यांची भारुडे आजही जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असून यामधून थट्टा, विनोद, उपरोध, उपहास जनमाणसांना सुयोग्य मार्गदर्शन करत त्यांच्या दोषाचे मार्मिक दिग्दर्शन केले आहे. संत एकनाथ 'एका जनार्दन' असा स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.


संत एकनाथांची वंशावळ
-संत भानुदास (एकनाथांचे पणजोबा)
-चक्रपाणी आणि सरस्वती ( आजोबा आजी)
-सूर्यनारायण आणि रुक्मिणी (वडील आई)
-संत एकनाथ आणि गिरीजाबाई
-गोदावरी, गंगा (मुली) हरी (मुलगा)