परभणी, दि. १७ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून परभणी शहरासह जिल्ह्यातील संचारबंदी अजून दोन दिवस वाढविण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री नवाब मलिक बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री मलिक म्हणाले, जिल्ह्यामध्ये १७ जुलैच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी दोन दिवस संचारबंदीत वाढ करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला आहे. तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून शहरासह जिल्ह्यात सर्व नागरी व ग्रामीण क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य पथकांच्या माध्यमातून डोअर-टू-डोअर व्यापक सर्व्हेक्षण मोहिम हाती घेण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी दिल्या.

या सर्व्हेक्षणातून कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळतात का, याबाबतचे सर्व्हेक्षण करावे. तसेच या सर्व्हेक्षणातून अन्य गोष्टी सुद्धा पुढे येण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना आप-आपल्या घरामधूनच (होम क्वारंटाईन) बंदिस्त राहण्यास जिल्हा प्रशासनाद्वारे मुभा देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या व्यक्तींनी होम क्वारंटाईनला प्राधान्य दिले आहे, अशा व्यक्तींना होम क्वारंटाईनसाठी प्रशासनाद्वारे परवानगी दिली जाईल. परंतु या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, यादृष्टीने प्रशासनाद्वारे सर्वतोपतरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. विशेषतः ज्या घरात लोकांना क्वारंटाईन करण्यात येईल अशा घरांच्या प्रवेशद्वारास प्रशासनाद्वारे सील ठोकणार असून त्या घरांच्या दर्शनी भागात फलक लावून या घरातल्या व्यक्ती होमक्वारंटाईन केलेल्या आहेत, अशी नोंद करण्यात येणार आहे. शक्य आहे त्या ठिकाणी काही कर्मचारी ही तैनात करून होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु किंवा गरजांची पूर्तता करण्याचे नियोजन करावे.

जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या पुरेशी नाही. याकरिता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाकरिता १६ रूग्णवाहिका लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्याच्या सूचनाही पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिल्या. याकरिता जिल्ह्यातील दोन खासदार व सहा आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी २ रुग्णवाहिका खरेदी करता येऊ शकतात. याकरिता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सर्व लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करुन रुग्णवाहिका खरेदीकरिता तातडीने निधी उपलब्ध होण्याबाबची कार्यवाही करावी.

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. याकरिता मूळ परभणीतील मात्र मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना परभणीत पाचारण करण्या संदर्भात विचार विनिमय सुरू असुन, यानुसार १२ ते १४ डॉक्टर्स उपलब्ध झाल्यास नक्कीच कोरोना विरूद्ध लढा देण्यास मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्री मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यात खरीप हंगामात झालेली पेरणी, पीक कर्ज, पीक विमा, किसान कार्ड, खाजगी रुग्णालयांना कोविड-१९ उपचारांची मान्यता, नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी देण्यात येणारे ई-पास, क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना दर्जेदार अन्न, रुग्णालयातील कोरोना वार्डची स्वच्छता आदी विषयांचा आढावा पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी घेतला.

यावेळी आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (पुरवठा) मंजुषा मुथा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत तसेच तज्ज्ञ डॉक्टर्स, विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता