मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर असताना चर्चा करून दिशा ठरवली जाईल

नाशिक : दि. १७ जुलै : राज्यासह जिल्ह्यातील नागरीकांनी सद्भावनेतून पुढाकार घेवून लॉकडाऊन केले, मात्र त्यातून काही हाती लागत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या विरोधात आपली भूमिका नसून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर भर आहे; पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तज्ञांसमवेत  नाशिक दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी लॉकडाऊन तसेच इतरही अनुषंगिक निर्णय मुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून घेतले जातील, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते.

या बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम  माने, महानिरीक्षक छेरिंग दोरजे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, मुंबई प्रमाणे नाशिक शहरातील प्रत्येक दवाखान्यासाठी महापालिकेने संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करावी व रुग्ण व्यवस्था, प्रवेश, बिल्स, इत्यादी बाबींवर नियंत्रण ठेवण्याची सर्व जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर असेल. त्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांकडे असावेत. मविप्र चे रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन यापुढे महानगरपालिकेकडे असेल व महानगरपालिका त्यांचे निधीतून या रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचारीवृंद, औषधे व अन्य अनुषंगिक संपूर्ण खर्च भागवेल. महापालिकेने कायमस्वरूपी व्हेंटिलेटर्स  व ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी व अन्य महापालिकांनी ज्या पद्धतीने रुग्णालय अधिगृहित केली आहेत त्या पद्धतीने नाशिक मनपाने या रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन करावे. तसेच मविप्र रूग्णालयाच्या सनियंत्रणासाठी अतिरिक्त मनपा आयुक्त श्री. प्रवीण आष्टीकर यांची नियुक्ती करावी असेही निदेश यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.

नाशिक महानगरपालिकेने आपल्या रूग्णालयांमध्ये आयसीयु युनिट वाढवावेत. तसेच त्यासाठी तज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहित करण्यात याव्या व नर्सेस इत्यादी स्टाफ कायमस्वरूपी वेतन पटलावर घेण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या. एसएमबीटी रूग्णालयामध्ये मध्ये १०० बेडसची व्यवस्था करण्यात यावी व पुढील आठवड्यात त्याठिकाणी रुग्ण दाखल करण्यास सुरुवात करावी. 

जिल्ह्यातील कुठलाही रुग्ण उपचारविना राहता कामा नये. कोमॉर्बीड रुग्णाबाबत अधिक दक्षता घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात. जिल्ह्यातील डेथ रेट कमी करण्याबाबत अधिक प्रयत्न व्हावा, महाराष्ट्राच्या तुलनेत नाशिकचा डेथ रेट कमी असला तरी तो अजून कमी करण्याबाबत प्रशासनाला सूचना देताना मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, एक सुद्धा मृत्यू होता कामा नये अशा सूचना शासनाच्या आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत आपण जिल्ह्यात कमी डेथ रेट आहेत यावरही समाधानी न राहता तो शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

लॉकडाऊन करण्याची अनेक नागरिकांची मागणी आहे तर लॉकडाऊन करू नये अशीही अनेक नागरिकांची मागणी आहे. लॉकडाऊन किती वेळा करावा हा प्रश्न आहे. तसेच ज्या ठिकाणी   लॉकडाऊन नव्याने सुरू करण्यात आले आहेत या ठिकाणी देखील कोरोनाची साखळी तुटलेली नसून उलटपक्षी लॉकडाऊनच्या भितीने झालेल्या गर्दीतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. अर्थचक्र नव्याने सुरू करण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे लॉक डाऊनचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा लागणार आहे.

शहर व जिल्ह्यात बेडची संख्या मुबलक प्रमाणात आहे. जिल्हा रुग्णालयात अधिक ४० व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात यावी. ठक्कर डोम मध्ये भविष्यातील संकटाचे पूर्वनियोजन म्हणून व्यवस्था करण्यात येत आहे, मात्र अद्याप आपल्याकडे  कोरोना केअर सेंटरचे १२०० बेडस शिल्लक असल्याने ते अपुरे पडल्यानंतर ठक्कर डोमसह इतर ठिकाणी जादा सोय करण्याचा विचार करण्यात येईल अशी माहिती महापालिका आयुक्त श्री. गमे यांनी दिली. सध्या बिटको येथे नव्याने हॉस्पिटल तयार करीत असतानाच अस्तित्वात असलेल्या हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा पुरविण्यावर अधिक भर देण्याच्याही सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम  माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे,  मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आपापल्या क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती सांगून पुढील नियोजनाच्या दिशा कशी असेल याबाबत पालकमंत्री यांना अवगत केले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता