‘मिशन झीरो’ मोहिमेचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे दि. १३   कोरोनाविरूद्धचा लढा यशस्वी करायचा असेल तर त्याचा प्रामाणिकपणे पाठलाग करून त्याची साखळी तोडण्याची गरज आहे. ‘मिशन झीरो’ ही मोहीम यशस्वी होईल असे मत राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ठाण्यात आजपासून ‘मिशन झीरो’ मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यावेळी श्री शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री  डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा, भारतीय जैन संघटनेचे धर्मेश जैन, दिपक गरोडिया, राजूल व्होरा, नैनेश शहाआदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. शिंदे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण त्याच्या मागे लागले पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित करण्याची गरज आहे. हे जर झाले तर योग्यवेळी रूग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करता येतील आणि मृत्यूचा दर कमी करणे आपल्याला शक्य होईल असे सांगितले.

सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे सांगून श्री शिंदे यांनी संख्या वाढली तरी हरकत नाही पण योग्यवेळी रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवा असे सांगितले.

क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगले जेवण, वेळेवर औषधे दिली जात आहेत. ती माहिती लोकांपर्यंत पोहोचू दे जेणेकरून क्वारंटाईन सेंटरविषयीची लोकांच्या मनातील भीती दूर होईल. रूग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये संवाद करून द्या जेणेकरून रूग्णाला मानसिक धीर मिळेल. माणसांचा जीव महत्त्वाचा आहे असे सांगून प्रभाग समिती स्तरावर नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या समित्या तयार करा असे सांगितले.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी  सर्व यंत्रणा कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, असेच काम आपल्याला पुढच्या काळातही करायचे आहे असे सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी कोरोना बाधितांची संख्या वाढली तरी आमचे कोरोनावरील नियंत्रण सुटलेले नाही. आपण चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे ही संख्या वाढत आहे. पण त्यापैकी 80 टक्के बाधित रूग्ण हे असिम्टोमॅटिक आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही असे सांगितले.

प्रारंभी भारतीय जैन संघटनेचे धर्मेश जैन यांनी प्रास्ताविक केल्यानंतर दिपक गरोडिया यांनी या मोहिमेविषयीची माहिती सांगितली. तर नैनेश शहा यांनी आभार प्रदर्शन केले.

‘मिशन झीरो’ मोहिम ही भारतीय जैन संघटनचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली देश अपनाये ही स्वयंसेवी संस्था, एमसीएचआय क्रेडाई आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नांतून चालविण्यात येणार आहे. यापूर्वी या संघटनांच्या माध्यमातून मुंबई, पुणे, मालेगाव, नाशिक या शहरांबरोबरच गुजरात, कर्नाटक या ठिकाणी चांगले काम केले आहे. या मोहिमेतंर्गत 9 मोबाईल डिस्पेन्सरीज 9 प्रभाग समित्यांमध्ये कार्यरत राहणार असून त्यामाध्यमातून ताप रूग्ण तसेच कोरोना सदृश रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता