जिल्ह्यातील रोजगाराच्या संधी व उद्योग समूहातील जागांचा घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 10  : कोरोना संसर्ग काळात केवळ मुंबई-पुणेच नाही तर, देश-विदेशातून आपापले रोजगार व आस्थापना सोडून अनेक युवक, अनेक कुटुंब आपल्या गावांकडे शहरांकडे पोहोचले आहेत. त्यामुळे रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग या घटकाशी संबंधित सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी या संधीचा फायदा घ्यावा. सर्व स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच स्टार्टअप सारख्या नव्या छोट्या व मोठ्या उद्योगांसाठी पतपुरवठा, जागा उपलब्धता व अनुषंगिक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे आवाहन राज्याचे मदत पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

कोरोना संसर्ग झाल्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक वेगवेगळ्या शहरांतून परत आले आहेत. यामध्ये कामगार, व्यावसायिक, उद्योजक आणि मोठ्या शहरात स्वतःचा उद्योग असणारे देखील परत आलेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांनी एकीकडे बेरोजगारांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देतानाच मागणीप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मकपणे पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले .

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज उद्योग मित्र समितीची सभा घेण्यात आली. ना. वडेट्टीवार यांनी यापूर्वी देखील उद्योग मित्र समितीच्या बैठकी मार्फत जिल्ह्यातल्या प्रत्येक उद्योग समूहात असणाऱ्या जागा, रोजगाराची उपलब्धता, याचा आढावा घेतला होता. आज यासंदर्भातील पुढील बैठकीमध्ये त्यांनी वरील आवाहन केले.

या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेच्या आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह सर्व विभाग प्रमुख. तसेच जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा कौशल्य विकास विभाग, व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण, पतपुरवठा, देणाऱ्या संस्था शिखर बँक बँकेचे प्रतिनिधी, तसेच जिल्ह्यातील सर्व उद्योग समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना संक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग समूहांना मनुष्यबळ हवे आहे. या उद्योग समूहामध्ये मनुष्यबळ भरती करताना, स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना व अन्य ठिकाणावरून आपला रोजगार सोडून आलेल्या कुशल कामगारांना देखील संधी मिळाली पाहिजे. यासोबतच ज्यांनी आपल्या छोट्या मोठ्या उद्योगांना बंद करून पुन्हा आपले शहर गाठले आहे. परत आले, त्या सर्वांना स्थानिक स्तरावर नव्याने काही उद्योग व्यवसाय उभारायचे असल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा झाला पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध आस्थापनांवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची स्थायी व अस्थायी पदांची माहिती घेतली. सोबतच वेगवेगळ्या आस्थापनांच्या बाबतची माहिती जाणून घेतली. सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या उद्योगांमध्ये किती प्रमाणात उत्पादन सुरू आहे. त्यांना किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याबाबतची आकडेवारी जिल्हा उद्योग केंद्राने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी सादरीकरण केले.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास विभागामार्फत जिल्ह्यामध्ये उद्योजकांची नोंदणी, महाजॉब पोर्टल वरील संधी, तसेच ऑनलाइन रोजगार मेळावा यासंदर्भात भैय्यासाहेब येरमे यांनी माहिती दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कोरोना संक्रमण काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात रोजगार विषयक संधी व जिल्ह्यामध्ये येणाऱ्या बेरोजगारांच्या नावांची नोंद सुरू आहे. मुंबई-पुणे या शहरांमधून मोठ्या प्रमाणात बाहेर राज्यातील कामगार आपल्या राज्यात परतले. या ठिकाणच्या एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. ही संधी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार पर्यंत पोहोचविणे उचित ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी  जिल्हा ग्रामीण यंत्रणेमार्फत सुरू असणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीमध्ये खासदार धानोरकर यांनी देखील जिल्हाभरात नव्याने आलेल्या बेरोजगारांना स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात संधी मिळायला हवी. त्यामुळे सर्व यंत्रणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. काही नवे उद्योग व्यवसायाला या काळामध्ये सुरुवात होऊ शकते. त्यामुळे विदेशातून आपला रोजगार व्यवसाय सोडून आलेल्या नागरिकांची देखील संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा उद्योग केंद्र व सुशिक्षित बेरोजगारांना संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी या काळामध्ये रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवावी, प्रसिद्धि अभियान हाती घ्यावी, असे आवाहन केले.

पालकमंत्र्यांनी दुपारच्या सत्रात वनविभाग जिल्हा खनिज विभाग व अन्य विभागाचा देखील आढावा घेतला.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता