पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी

अमरावती : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलाची तत्काळ दुरूस्ती करून संपर्कयंत्रणा भक्कम करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. अतिवृष्टीने जिल्ह्यातील सालोरा खुर्द, नांदुरा किरकटे, आमला आदी गावातील रस्ते, पुलाचे नुकसान झाले त्याची पाहणी पालकमंत्र्यांनी गावांना भेट देऊन केली. संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा पूर आल्याने अनेकदा रस्ते, पूल वाहून जातात. त्यामुळे अशी स्थिती लक्षात घेऊन दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी सुसज्ज यंत्रणा ठेवावी. कुठल्याही गावांचा संपर्क तुटता कामा नये. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या प्रत्येक भागाचे काटेकोर सर्व्हेक्षण करून रस्ते व पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्यात भक्कम संपर्क यंत्रणा सुसज्ज असावी. मेळघाटात अनेकदा गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे तिथेही प्राधान्याने लक्ष देऊन रस्त्यांची व पुलाची कामे पूर्ण करावीत. पावसाळा लक्षात घेऊन भक्कम पायाभूत सुविधांसह आरोग्य यंत्रणाही सक्षम असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पुरेसा औषध साठा आदी सुविधा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी अतिवृष्टी झालेल्या विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची व पुलांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांसंदर्भात प्रशासनाशी चर्चा केली व वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता