
भंडारा,दि. 10 :- गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामकाजाचा पालकमंत्री सुनील केदार यांनी आज आढावा घेतला. या बैठकीत गोसेखुर्द डावा कालवा, उजवा कालवा, नेरला, करजखेडा, सुरेवाडा, धारगाव टप्पा एक व दोन उपसा सिंचन योजनांना आढावा घेण्यात आला. गोसेखुर्दच्या पुनर्वसनाला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
वाही येथील विश्रामगृहात गोसेखुर्द प्रकल्पाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अधीक्षक अभियंता गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळ भंडारा जगत टाले, कार्यकारी अभियंता गोसेखुर्द धरण विभाग वाही राजेश शर्मा, कार्यकारी अभियंता गोसेखुर्द डावा कालवा विभाग वाही सुहास मोरे, कार्यकारी अभियंता गोसेखुर्द उपसा सिंचन विभाग अंबाडी अनिल फरकाडे, कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभाग नागपूर विजयश्री बुराडे व कार्यकारी अभियंता यांत्रिक विभाग नागपूर श्री. वऱ्हाडे यावेळी उपस्थित होते.
गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता १८ हजार ४९४ कोटींची असून एकूण पाणीसाठा क्षमता ११४६ दलघमी आहे. गोसेखुर्दची सिंचन क्षमता २ लाख ५० हजार ८०० हेक्टरची असून या हंगामात १ लाख १४ हजार ४५१ हेक्टर सिंचन झाल्याची माहिती अधीक्षक अभियंता जगत टाले यांनी दिली. गोसे धरण येथे खासगीकरण अंतर्गत दोन जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
गोसेच्या डाव्या कालव्याची लांबी २३ किमी असून कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. गोसेखुर्द अंतर्गत येणाऱ्या उपसा सिंचन योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली असून २८ हजार ६८० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या उपसा सिंचन योजनेतून मार्च अखेर १० हजार ६१२ हेक्टर सिंचन झाले आहे.
करजखेडा, सुरेवाडा, धारगाव टप्पा एक व दोन आदी योजनांचाही आढावा यावेळी घेण्यात आला. गोसेखुर्द प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रति वर्ष दोन हजार कोटी निधी आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गोसेखुर्द पुनर्वसनाचे काम गतीने करावे, असे पालकमंत्री म्हणाले. बाधित गावे भंडारा ३४, नागपूर ५१, स्थलांतरित गावठाणे भंडारा २१ व नागपूर २७ आणि बाधित होणारे कुटुंब भंडारा ६६३६ व नागपूर ८३४८ अशी आहेत.
पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने गोसेखुर्द धरण परिसराचा विकास करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. लवकरच मुबई या विषयावर पर्यटन व जलसंधारण विभाग यांची बैठक बोलविण्यात येईल असे पालकमंत्री म्हणाले. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी गोसेखुर्द धरणाची पाहणी केली.
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता