यवतमाळ, दि. 7 : कोरोना विषाणू संसर्गामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा या कठीण प्रसंगी शासन अणि प्रशासन नागरिकांकरिता अनेक उपाययोजना करीत आहे. शासनाच्या या मदत कार्यात अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजक आदींचासुध्दा हातभार लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पोहरादेवी येथील देवी सेवालाल संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 1 लक्ष 1 हजार 111 रुपयांचा धनादेश देण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष महंत कबीरदास महाराज यांनी हा धनादेश सुपूर्द केला.

यावेळी प्रा. जगदीश राठोड, विलास राठोड, आदी उपस्थित होते. कोणत्याही संकटाच्या काळात पोहरादेवी देवस्थान नेहमी महाराष्ट्र शासन आणि संजय राठोड यांच्या मागे सदैव खंबीरपणे उभे राहील, असे अभिवचन महंत कबीरदास महाराज यांनी दिले. यावेळी पालकमंत्री राठोड यांनी शासनाच्या वतीने पोहरादेवी देवस्थानचे आभार व्यक्त केले. या देवस्थानच्या विकासात कोणतीही कमतरता राहणार नाही, असेही त्यांनी आश्वस्त केले.

शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोव्हिड – 19’ या नावाचे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई – 400023 येथे उघडले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 असून शाखा कोड  00300 तर आयएफएससी कोड SBIN0000300 असा आहे. दिलेल्या या शाखेत नागरिक आपले धनादेश जमा करू शकतात. किंवा रकमेचे धनादेश यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करू शकतात.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता