
चंद्रपूर ( ब्रम्हपुरी ) दि 13 : ब्रह्मपुरी शहरामध्ये सध्या सुरू असणारे लॉकडाऊन 15 जुलैपासून परत घेतले जाईल. मात्र शहर व ग्रामीण भाग मिळून तालुक्यामध्ये 42 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे ही परिस्थिती बदलणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन मदत पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची याठिकाणी बैठक घेऊन कोरोना आजारा संदर्भातील आढावा घेतला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नगराध्यक्ष रीता उराडे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुभाष खिल्लारे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा परिषदेचे उप अभियंता नन्नावरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दूधपचारे , जि.प. सदस्य चिमूरकर, विलास विखारे, खेमराज तिडके आदींची उपस्थिती होती.
तालुक्यामध्ये सध्या शहरात 14 तर ग्रामीण भागात 28 असे एकूण 42 बाधित आहेत याशिवाय गेल्या आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या शहराच्या विविध भागात घेण्यात आलेल्या आहे. त्यामुळे लॉकडाउन उठविल्यानंतर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद झाली पाहिजे. याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी आरोग्य यंत्रणेला यावेळी निर्देश दिले.
तालुक्यातील तपासणी आणखी वाढविण्यात यावी. स्वॅब चाचण्या अधिकाधिक व्हाव्यात. अलगीकरण व विलगीकरण कक्षांमध्ये चांगल्या सुविधा मिळत आहेत .याची प्रत्येकाने खात्री करावी. नागरिकांना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय सुविधा व मानसिक आधार देण्यात यावा, तसेच चेक पोस्टवर प्रत्येकाची तपासणी व त्याबाबतची माहितीची देवाणघेवाण व्हावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या मार्फत सुरू असलेल्या सौंदर्यकरण्याच्या कामाचा देखील आढावा घेतला. ब्रह्मपुरी शहरात प्रलंबित असणाऱ्या सौंदरी करण्याच्या कामाला वेग देण्याबाबत त्यांनी यावेळी सांगितले प्रमुख शहरातील अनेक प्रलंबित प्रकल्प व प्रस्तावित प्रकल्प या संदर्भातही त्यांनी आढावा घेतला शहराचा चेहरा-मोहरा बदलला पाहिजे यासाठी कालमर्यादेत प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी नगर परिषदेला दिले.
यावेळी खनिज निधीमधून तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या रस्ते बांधकामाचा देखील त्यांनी आढावा घेतला.पावसाळ्यामध्ये साथ रोगाचे प्रमाण वाढू नये, यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी आवश्यक औषध पुरवठा व सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश द्यावे, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी पुढील काही काळ आणखी उत्तम सेवा द्यावी असे स्पष्ट केले.
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता