जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या १८ हजार नागरिकांना धान्यवितरणाचा लाभ – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती : लॉकडाऊन संपल्यानंतर अद्यापही रोजगाराबाबतची स्थिती पुरेशी सुधारलेली नसल्याने गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थ्यांसाठी आणखी तीन महिने ५ रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गरजू नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे, शिधापत्रिका नसलेल्या १८ हजार नागरिकांना गत दोन महिन्यात मोफत धान्याचा लाभ देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतला. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र, अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा  सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात विविध केंद्रांवरून अडीच हजार थाळ्यांचे वितरण होत आहे. जिल्ह्यात शिवभोजन योजनेअंतर्गत २२ केंद्रे कार्यरत आहेत. लॉकडाऊन काळातील गरज ओळखून तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात आला. मेळघाटातील चुरणी येथेही केंद्र सुरु आहे. शेकडो नागरिक या उपक्रमाचा लाभ घेत आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी दिली.

दक्षता नियमांचे काटेकोर पालन व्हावे

लॉकडाऊन काळात कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांना भोजन मिळण्यासाठी शासनाने शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार केला. त्यासाठी १६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. शिवभोजनाच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवभोजन उपाहारगृह चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतूक करून घेण्याबाबत नियमांचे पालन होते किंवा कसे, याची प्रशासनाने वेळोवेळी तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे, हात साबणाने स्वच्छ करणे, सर्व भांडी निर्जंतूक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, त्याचबरोबर प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही ऑगस्टपर्यंत सवलतीच्या दरात धान्य

मे आणि जून महिन्यामध्ये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता. सदर योजना आणखी दोन महिने चालू ठेवली जाणार आहे.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये यासाठी  केंद्र शासनाकडून २१ रुपये किलो दराने  गहू  व २२ रुपये किलो दराने तांदूळ घेऊन १२ रुपये प्रति किलोने दोन किलो तांदूळ व ८ रुपये किलोने तीन किलो गहू प्रति व्यक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मे आणि जून महिन्यामध्ये या धान्याचे  वाटप  करण्यात आले. अजून जनजीवन पूर्वपदावर आलेले नसल्याने सर्वसामान्य केशरी कार्डधारक नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य पुरविण्याची आवश्यकता असल्याने या योजनेला  जुलै आणि ऑगस्ट  या दोन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्यांना मोफत तांदूळ वाटप

लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना दोन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती दहा किलो मोफत तांदूळ व दोन किलो चणा वितरीत करण्यात येत आहे. आतापर्यंत १८ हजार ३०३ लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. टाकसाळे यांनी दिली. ९१ हजार ८६ किलो तांदूळ व ५ हजार किलो अख्खा चणा वितरीत केल्याचे ते म्हणाले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता