
अकोला दि. ११ – निंब वृक्षाच्या रोपाची लागवड करुन आपण आपला परिसर हिरवागार करु शकतो. त्याचे अनेक फायदे आपल्याला होतील. हे वृक्ष लागवड करुन त्यांची योग्य निगा राखण्याच्या या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कुंभारी येथील ग्रामस्थांना केले.
कुंभारी येथील हनुमान ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते गणेश महाविद्यालय, कुंभारी येथे निंब वृक्ष रोपणचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्री. कडू यांच्याहस्ते निंब वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी कुंभारीचे सरपंच संतोषकुमार भटकर, पंचायत समितीचे सदस्य विजय बाभुळकर, माजी आमदार तुकाराम बिडकर, तहसीलदार विजय लोखंडे, जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, माजी सरपंच बाळासाहेब अतकरी उपस्थित होते.
हनुमान ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत ५०० निंब वृक्षरोपण केले जाणार असून त्यांची सुरुवात गणेश महाविद्यालय, कुंभारी येथून करण्यात आली. निंब वृक्षरोपण अविरत सुरु राहण्यासाठी सामाजिक वनीकरण मार्फत वृक्षरोपणाकरिता पाणी व दोनशे झाडामागे एक मजूर याप्रमाणे तीन वर्षाकरिता उपलब्ध करुन देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी संबंधितांना दिले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या निंबवृक्षाची पाहणी करुन त्याची निगा राखल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतूक केले.
शेगाव-नरनाळा-चिखलदारा पर्यटन सर्कल तयार करुन पर्यटकांना दोन-तीन दिवस मुक्कामी राहता येईल, अशा पद्धतीने पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासाठी गावातील रस्ता दुरुस्ती व अन्य महत्त्वाची कामे करण्याबाबत त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले. वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाला गणेश विद्यालय, कुंभारी येथील शिक्षक, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता