पुणे दि.13 : –   कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना राबविताना लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासंबंधी आज पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख तसेच विशेष पोलीस अधिकारी यांची विधानभवनाच्या झुंबर हॉलमध्ये विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे,  झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कोरोना संसर्ग उपाययोजना संनियंत्रण अधिकारी राजेंद्र निंबाळकर, तहसिदार विकास भालेराव, पुणे म.न.पा. परिमंडळ क्र.5 चे उप आयुक्त अविनाश सकपाळ, माधव जगताप, सहा.आयुक्त्‍ आशिष महाडदकर,सोमनाथ बनकर, दयानंद सोनकांबळे तसेच प्रमुख गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मंडळांमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोणत्याही संकटसमयी कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन मदत करण्याचा असतो. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरीकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून झालेली आहे. स्थानिक नागरिकांचा मंडळाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास असतो. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आव्हानांबाबत तात्काळ आणि प्रभावीपणे जनजागृती करता येणे शक्य होते. त्यामुळेच त्यांचा सहभाग महत्तवाचा ठरतो.येणारा काळ हा प्रत्येकाची परीक्षा पहाणारा असणार आहे. त्यामुळे जनतेच्या समन्वयातूनच आपण परिस्थिती हाताळू शकतो. याकरिता जास्त जास्त गणेशमंडळाचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, प्रशासनाकडून देण्यात येणारी माहिती व सूचना हया या कार्यकर्त्यामार्फत्‍ नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी व्हॉटसअप ग्रुप तथा इतर माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या.

यावेळी या पदाधिकाऱ्यांमार्फत काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय साधनसामग्रीचा पुरवठा, विलगीकरणाकरीता जागा, बेड व वैद्यकीय अधिका-यांची सेवा पुरविण्याकरीता प्रशासनाला मदत करण्याचीही तयारी दर्शविण्यात आली. कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना असल्याचे आणि पहिल्या दिवसापासून याबाबत पोलीस, महानगरपालिका, प्रशासनाला मदत करण्यात आल्याचे सांगितले. यापुढील कालावधीमध्ये करावयाच्या मदतीविषयी प्रशासनाने सूचना केल्यास त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. यापूर्वीच्या बैठकांमध्ये केलेल्या सूचनांबाबत विभागीय आयुक्तांकडून दखल घेण्यात आली  व काही सूचनांवर तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांचे आभार मानले. तसेच कोरोनाच्या संकटाच्या कोणत्याही आवाहनावेळी प्रशासनाबरोबर राहू,अशी ग्वाही दिली.

विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी या कार्यकर्त्याच्या सकारात्मक भूमिकेबाबत त्यांचे कौतुक केले तसेच यापुढील काळात समन्वयाने हे संकट निभावून नेऊ, असा विश्वास व्यक्त केला.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता