अमरावती, दि. १७ : जिल्ह्यातील पशुधनाच्या लसीकरणाच्या कामात अडचण आली. मात्र, पावसाळा लक्षात घेऊन या कामाला वेग द्यावा. पशुधन हे शेतीसाठी व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे असून, त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी विविध योजना- उपक्रम राबवावेत. पशुरोग निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले.

पशुसंवर्धन हा शेतकरी बांधवांचा शेतीला जोडून असलेला अत्यंत महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. शेतीच्या कामापासून ते दुग्धोत्पादनापर्यंत कितीतरी बाबींसाठी पशुधन मोलाचे असते. त्यामुळे पशुधनाचे संवर्धन करण्यासाठी नियमित लसीकरण, वैरण विकास कार्यक्रम आदी विविध योजना व उपक्रमांना वेग द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्ह्यात सुमारे पाच लाख ९४ हजार अशी मोठी पशुसंपदा आहे. लाळ खुरकत रोगावर प्रतिबंधक कवच ठरणारी लस यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये त्यावर काहीशी मर्यादा आली. मात्र, आता या कामाला गती मिळणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी ५ लाख ९४ हजार लसी जिल्ह्यात प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जनावरांमध्ये लाळ खुरकत हा वेगाने पसरणारा व लगेच प्रसार होणारा रोग आहे. हे लक्षात घेऊन पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घटसर्प, फऱ्या आंतरविकारचे मान्सूनपूर्व लसीकरण पूर्ण झालेले आहे. पशुधनाचे टॅगिंग करून लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विजय राहाटे यांनी दिली.

अद्यापपावेतो लसीकरणाच्या १५ फेऱ्या झाल्या

अमरावती जिल्ह्यात १६८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. राष्ट्रीय पशुरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत लसीकरण मोहिम राबविली जाते. जिल्ह्यात अद्यापपावेतो १५ फेऱ्या झाल्या आहेत. या लसीकरण मोहिमेमुळे तोंडखुरी, पायखुरी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला आहे. सध्या अमरावती जिल्ह्यात लाळ्या खुरकत रोगाचा प्रादुर्भाव नाही, असे डॉ.रहाटे यांनी सांगितले.

ते म्हणाले, राष्ट्रीय पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात लसीकरण करण्यापूर्वी व त्यानंतरही पशुधनाचे रक्तजल नमुने तपासले जातात. रक्तजल नमुन्यामधून रोगप्रतिकारक शक्ती तपासली जाते. रोगाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी एकूण २४ फेऱ्या होणार असल्याचे डॉ.रहाटे यांनी सांगितले.

तोंडखुरी, पायखुरी रोग विषाणूजन्य असून, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी प्राण्यांना होतो. गाई-म्हशींत त्याचे प्रमाण अधिक असल्याने वर्षातून दोनदा लसीकरण केले जाते. लाळ खुरकत रोगावरील प्रतिबंधक लसीमुळे जनावरांमध्ये निर्माण होणाऱ्या प्रतिकार क्षमतेचा कालावधी सहा महिने असतो, असेही त्यांनी सांगितले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता