अकोला दि. ११ – येथील ७६ वर्षांची परंपरा असलेला श्री राजराजेश्वर कावड महोत्सव यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने साजरा करावा व परंपरेचे पालन कसे करावे याबाबत राजराजेश्वर मंदिर समिती, कावड व पालखी मंडळे यांनी समन्वयाने निर्णय घेऊन प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी कावड यात्रोत्सवासंदर्भात आयोजित बैठकीत बोलताना केले.

या बैठकीस आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजान शेळके, मंदिर समितीचे विश्वस्त नरेश लोहिया, गजानन घोगे, ॲड.राम पाटील, डॉ.गोपाळ नागपुरे, चंद्रकांत सावजी, राजेश चव्हाण तसेच कावड व पालखी मंडळांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

दरवर्षी १२० मंडळे आपापल्या पालख्या व कावड यात्रा घेऊन श्रावण महिन्यात येत असतात. त्यात पालखी व कावड यांचा समावेश असतो. तथापि यंदा कोविड महामारीच्या आपत्तीच्या प्रसंगी ही परंपरा कशा पद्धतीने पाळली जावी? याबाबत सर्व भाविक, मंदिर समिती, कावड व पालखी उत्सव समितीचे सदस्य, मंडळांचे प्रतिनिधी यांनी सामोपचाराने निर्णय घेऊन प्रशासनास प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा, असे आवाहन श्री.कडू यांनी यावेळी केले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता