मुंबई दि.25: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठामार्फत नजर ठेवण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा घेणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ ठरले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखा वगळता इतर पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांची (दंत,आयुर्वेदिक,युनानी, होमिओपॅथी,नर्सिंग,फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओलॉजी स्पीच थेरपी) यांची लेखी परीक्षा 17 ते 23 ऑगस्ट 2020 या काळात राज्यातील 115 केंद्रांवर पार पडली. या परीक्षेत 2421 विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज आले होते. आणि या परीक्षेला विद्यार्थ्यांची सरासरी 90 टक्के उपस्थिती होती.

श्री. देशमुख यांनी याबाबत माहिती दिली की, विद्यार्थ्यांची परीक्षा कोविड-19 परिस्थितीला अनुसरून सुरक्षित वातावरणात घेण्यात आली. या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 24 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर डिप्लोमा व सुपर स्पेशालिटी वैद्यकीय विद्याशाखेचे 2204 विद्यार्थी बसणार असून सदर परीक्षा 30 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सर्व वैद्यकीय आरोग्य विज्ञान विज्ञान शाखा यांच्या अंतिम वर्ष पदवीपूर्व व प्रथम वर्ष एमबीबीएस (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा 8 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर 2020 व प्रात्यक्षिक परीक्षा विद्या शाखानिहाय 20 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा 274 परीक्षा केंद्रांवर होणार असून या परीक्षेसाठी 9688 विद्यार्थी बसणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मार्फत सर्व वैद्यकीय परीक्षांची तयारी पूर्ण करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता