अमरावती, दि. २८ : जिल्ह्यातील निम्न वर्धा, बेंबळा आदी प्रकल्पांच्या पुनर्वसनाच्या कामांची सद्य:स्थिती व आवश्यक कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

प्रकल्प पुनर्वसन उपाययोजनांबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निम्न वर्धा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, जीवन प्राधिकरण आदींचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रकल्प पुनर्वसितांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रलंबित कामे, भूसंपादन, प्रलंबित निधी आदींचा सविस्तर अहवाल सादर करावा. आवश्यक तिथे शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. मात्र, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. पुनर्वसित बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन त्याचे वेळीच निराकरण करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

आमदार श्री.अडसड यांनी पुनर्वसितांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी व प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने गतीने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गाव हस्तांतरणाची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून होण्याची सूचनाही त्यांनी केली.

याबाबत पुनर्वसनाच्या कामांना गती येण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालयांनी वेळोवेळी माहिती देऊन नियोजनपूर्वक कामे पूर्णत्वास न्यावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता