
अमरावती, दि. २९ : हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करून शेतकरी व संपूर्ण कृषी क्षेत्राला सक्षम करण्याचा पोकरा योजनेचा हेतू आहे. तथापि, योजनेत सद्य:स्थितीत अमरावती जिल्ह्यात कृषी कार्यालयांकडून अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे दिसते. त्यामुळे कृषी विभागाने मिशनमोडवर कामे करून महिनाभराच्या आत प्रलंबित कामांचा निपटारा करावा, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
जिल्ह्यातील खरीप परिस्थिती व विविध योजनांचा आढावा कृषी मंत्री श्री. भुसे यांनी नियोजनभवनात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी संचालक नारायण शिसोदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे आदी उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, अमरावतीच्या नियोजनभवनाच्या याच सभागृहात सरपंच महोदयांची बैठक आपण यापूर्वी पोकरा अंमलबजावणीबाबत घेतली होती. त्यानंतर या कामाला गती येणे अपेक्षित होते. तथापि, तालुका व उपविभागीय कृषी कार्यालयाकडे बरेच अर्ज प्रलंबित राहिल्याचे दिसते. हे अत्यंत गंभीर आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. येत्या महिनाभरात त्यावरील कार्यवाही पूर्ण झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेळोवेळी पोकरा योजनेचा आढावा घेत आहेत. योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील स्थिती सुधारली पाहिजे.
‘रिझल्ट ओरिएंटेड’ कामे करा
योजनेची परिणामकारक अंमलबजावणी झाली पाहिजे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने प्राधान्याने हे काम पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले. परिस्थितीनुरूप बदलासाठी योजनेचे स्वरूप लवचिक ठेवले असून, लोकप्रतिनिधींच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या १ लाख ११ हजार ८२० कर्जखात्यापैकी ९४ हजार ४८५ खात्यांना ६९६ कोटी ७९ लाख रक्कम प्राप्त झाली आहे. पात्र शेतकरी बांधवाना कर्जमुक्ती मिळून त्यांना खरीपाचे नवे कर्ज मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्यात खरीपाचे ७६३ कोटी ९१ लाख रुपये अर्थात ४४ टक्के कर्जवाटप झाले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीनंतर जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वितरणाचे प्रमाण वाढणे अपेक्षित होते. त्यामुळे मिशनमोडवर कामे करून कर्ज वितरणाला गती देण्याचे निर्देश कृषी मंत्री श्री. भुसे यांनी दिले.
यंदा अधिक पर्जन्यमानामुळे सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे नुकसान झाल्याचे दिसते. अनेक ठिकाणी किडीचा प्रादूर्भाव आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत. पीएम किसान योजनेला गती देण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. बियाणाची उगवण न झालेल्या क्षेत्राबाबत आवश्यक कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी दिले.
पोकरा योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्पाशी या योजनेची सांगड घालावी. ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेनुसार बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे व शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करणे असा हेतू ठेवून पोकराची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
खारपाणपट्ट्याकडे विशेष लक्ष पुरविणे गरजेचे : पालकमंत्री श्रीमती ठाकूर
जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील गावांचा पोकरा योजनेत समावेश आहे. त्यामुळे या परिसराचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यानुरूप योजना राबविणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. स्थानिक स्तरावर योजनांच्या अंमलबजावणीबाबत काही अडचणी येत असतील तर अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना माहिती दिली पाहिजे. अंमलबजावणीत पारदर्शकता व स्पष्टता ठेवली पाहिजे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
अपघात विमा योजनेची परिपूर्ण अंमलबजावणी आवश्यक – राज्यमंत्री श्री. कडू
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या परिपूर्ण अंमलबजावणीसाठी कृषी विभागाने पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेऊन संबंधित कुटुंबांना लाभ मिळवून दिला पाहिजे. अनेकदा पात्र कुटुंबेही वंचित राहतात, असे राज्यमंत्री श्री. कडू यांनी सांगितले. कृषी सेवकांनी, अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस ठाण्याशी संपर्क ठेवून वेळोवेळी माहिती घ्यावी व कुठेही दुर्दैवाने अपघात झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला लाभ मिळवून द्यावा. सदर लाभ कृषी विभागाने स्वत:हून कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन दिला पाहिजे, असे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यातील संत्रा पिकाचे क्षेत्र पाहता या अनुषंगाने संशोधन व विकासासाठी स्वतंत्र संत्रा संशोधन केंद्र असावे, अशी सूचनाही श्री. कडू यांनी केली.
खरीप क्षेत्राबाबत…
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १२.२१ लाख हेक्टर असून लागवडीलायक क्षेत्र ७.८१ लाख हेक्टर आहे. यंदा खरीप पिकाचे पेरणी क्षेत्र ६ लाख ८१ हजार ६६० हेक्टर (९९ टक्के) आहे. वार्षिक पर्जन्यमान ८१५ मिमी आहे. यंदा आतापर्यंत पावसाची तालुकानिहाय सरासरी ६७२ मिमी असून, दि. २७ ऑगस्ट अखेर प्रत्यक्ष पाऊस ६२६ मिमी अर्थात ९३ टक्के झाला आहे.
जिल्ह्यात २ लाख ४५ हजार ४०८ हे. क्षेत्रावर कापसाची, २ लाख ६६ हजार ९१७ हे. क्षेत्रावर सोयाबीनची, १ लाख ७ हजार ६९४ हे. क्षेत्रावर तुरीची, १५ हजार ९२५ हे. क्षेत्रावर मुगाची, ४ हजार ९२५ हे. क्षेत्रावर उडदाची, १६ हजार २४९ हे. क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालेली आहे. संत्रा या मुख्य फळपिकाखालील लागवडीचे क्षेत्र ७० हजार ३१४ हे. आहे.
सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता