यवतमाळ, दि. 27 : सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला आहे. निरोगी राहण्यासाठी मनुष्याची धडपड सुरू आहे. त्यासाठी नियमित व्यायाम व सकस आहारावर जोर देण्यात येत आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश होतो. रानावनात नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्या यासाठी उत्तम पर्याय असून या रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत, असे प्रतिपादन वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी राजेंद्र धोंगडे आदी उपस्थित होते.

राज्यातील वनांमध्ये रानभाज्यांचे चांगले वैभव आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, मानवी शरीरासाठी पौष्टिक असणाऱ्या या भाज्यांचे महत्त्व व त्याचे फायदे आजच्या पिढीला अवगत व्हावे, या उद्देशाने मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्या सहकार्याने वनमंत्री म्हणून मी, रानभाज्या महोत्सवाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा घडवून आणली. त्यानुसार रानमहोत्सव सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. कृषी विभागाने यवतमाळमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या संख्येने भाज्या घेऊन आले असून येथे असणाऱ्या प्रत्येक भाजीचे वैशिष्ट्य आहे.

रानातील, जंगलातील व शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे / रानफळांचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती आजच्या परिस्थितीत नागरिकांना होणे काळाची गरज आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील नागरिकांसाठी विक्री व्यवस्था झाल्यास शेतकऱ्यांचा या माध्यमातून आर्थिक फायदा होईल. तसेच पर्यायाने नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील, असेही पालकमंत्री म्हणाले.

तत्पूर्वी पालकमंत्री संजय राठोड यांनी येथे लावण्यात आलेल्या विविध भाज्यांच्या स्टॉलला भेट देऊन प्रत्येक भाजीबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून रितसर महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रानभाज्यांचे महत्त्व आणि उपयोग’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित या महोत्सवात 16 तालुक्यातून एकूण 88 स्टॉल लावण्यात आले. यात अळू, हडसन, धोपा, सुरण, फांद, कुंदरा, कपाळकोडी, अंबाडी, कवठ, वाघाटी, शिरणी, वाळूक, आघाडा, केना, वज्रदंती, शतावरी, हेटीफुल, चिवड, मायाळू, शेवगा, वेलदोडी, भुईआवळा, खंडूचक्का, मसालापान, भोकर, नाय, सागरगोटी, गुळवेल, रानभेंडी, गवतीचाय, केळफुल, राजगीर, घोळ, जटाशंकर, शरपुंख, रानओवा, तोंडले, माटा, उंबर, रानतुळस आदी भाज्यांचा समावेश होता.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता