हिंगोली, दि. १४ : खरीप हंगाम २०२०-२१ करिता जिल्ह्यातील बँकांना पीक कर्ज वितरित करण्यासाठी १ हजार १६९ कोटी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी ५७ हजार ३४३ शेतकऱ्यांना उद्दिष्टाच्या केवळ ३४० कोटी म्हणजे २९ टक्के पीक कर्ज वितरित केले आहे. त्याकरिता सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळावे यासाठी बँकांनी त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पीक कर्ज वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या, यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने शेतकरी बांधवांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. परंतु अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ७१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण झालेले नाही. बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाकरिता टाळाटाळ करुन दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी पीक कर्ज वितरणासाठी गाव व बॅंक निहाय आराखडा तयार करुन तात्काळ पीक कर्ज वितरण करण्याचे निर्देश पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील अनेक बँकाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने बँक कर्मचारी हे दररोज जास्त वेळ थांबून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज करत आहेत. तसेच बँकेचे सर्व कामकाज हे ऑनलाईन रित्या चालते परंतु याठिकाणी इंटरनेट कनेक्टीव्हिटी ची समस्या असल्याचे बँक व्यवस्थापकांनी आपल्या समस्या यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांच्या पूढे मांडल्या.

यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता