अमरावती, दि. २६ : अमरावती विद्यापीठापाठोपाठ आता डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात कोविड -१९ परिक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम व संस्थेचे पदाधिकारी व अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे प्रयोगशाळा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आली असून अमरावतीत आणखी एक प्रयोगशाळा सुरू होत आहे. या प्रयोगशाळेमुळे जास्तीत जास्त टेस्ट्स करता येतील. चाचणी अहवाल लवकर प्राप्त झाल्याने रुग्णावर त्वरित उपचार करता येतील व कोरोना नियंत्रण उपाययोजनांना गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोरोना प्रतिबंधासाठी तत्काळ उपाययोजनेची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी या लॅबसाठी जिल्हा नियोजन निधीतून 50 लाख रूपयांचा निधी मिळवून दिला.

कोरोना प्रतिबंधासाठी रूग्णांचे तपासणी तत्काळ मिळणे खूप गरजेचे असते. सुरुवातीला अमरावती येथे लॅब नसल्यामुळे येथील संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर, अकोला, वर्धा येथे पाठविण्यात येत होते. ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पाठपुरावा करून तत्काळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची व त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेसाठी निधी मिळवून दिला. अमरावतीत दोन लॅब झाल्यास उपाययोजनांना गती येईल, हे लक्षात घेऊन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून लॉगिन आयडीची तांत्रिक अडचणही तत्काळ दूर केली.

त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील लॅब यापूर्वीच सुरु झाली. या लॅबकडून रोज अहवाल प्राप्त होऊन संबंधितांवर उपचार, संपर्कातील व्यक्तींचा शोध व स्वॅब मिळवून चाचणी करणे आदी सर्व प्रक्रियेला गती मिळाली आहे.

लॅबमध्ये चार तज्ज्ञ व सहा तंत्रज्ञ आहे. त्यांचे प्रशिक्षण झाले आहे. त्याशिवाय, इतर पाच मदतनीसांचा स्टाफ आहे. तीन पाळ्यांमध्ये ही यंत्रणा काम करेल. दर दिवशी साधारणत: 96 अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी दिली. ही कायमस्वरूपी तरतूद असून, ही अद्ययावत सुविधा अमरावतीसाठी मोठी उपलब्धी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागपूरसारख्या शहरात चार लॅब आहेत. त्यामुळे अमरावतीसारख्या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी दोन लॅब तरी असाव्यात, ही भूमिका घेऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दोन्ही लॅबच्या प्रस्तावांचा सकारात्मकपणे पाठपुरावा केला. त्यामुळे स्थानिक स्तरावरच दोन  सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बाबीची वेळेत खातरजमा करून उपाय करणे शक्य होईल. स्थानिक स्तरावर या सुविधा निर्माण झाल्यामुळे संसर्गजन्य आजारांबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती मिळणार आहे.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता