बीड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे ही चांगली बाब – पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा

कोरोना विषाणू संसंर्गाच्या आपत्तीमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे ही चांगली बाब आहे. या पार्श्वभूमीवर येत्या गणेशोत्सव काळात सर्वांनी दक्ष राहाणे गरजेचे असून यासाठी गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील विविध धर्माच्या नागरीकांनी आतापर्यंत सण उत्सव घरात राहून साजरे केले तसेच येथून पुढे देखील काळजी घ्यावी.

कोरोनाच्या संसर्गावर उपाय शोधण्‍यासाठी जगातील संशोधक अथक प्रयत्न करत असताना आपल्या जिल्ह्यात देखील कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला बळ देण्याची शासनाची भूमिका आहे. या प्रसंगी सर्व कोविड योद्ध्यांच्या सुरक्षेची प्रार्थना करताना जिल्ह्याला नागरिक आणि प्रशासन यांच्या सहयोगाने या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

कोरोना आपत्ती बरोबर राज्यात चक्रीवादळ, अतिवृष्टी आली. या एका पाठोपाठ आलेल्या संकटांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन जनतेची संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्यासाठी सतत सज्ज आहे.

आपल्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ  वैद्यकीय महाविद्यालय येथे आधुनिक यंत्रसामग्री व उपचार पद्धती विकसित केल्या जात आहेत. या कोरोनाच्या आपत्तीमध्ये नागरीकांना दिलासा देणारी प्रक्रिया राबवली जात आहे. कोविड कक्ष स्थापनेपासून, व्हीआरडीएल प्रयोगशाळा व पहिली प्लाझ्मा थेरपी ही अत्याधुनिक यंत्रणा यासह अनेक उपायातून कोरोनाशी लढणाऱ्या अतिगंभीर रुग्णांना जीवदान मिळत आहे.

शासनाच्या उपाययोजना, जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न आणि सूचनांचे नागरिकांनी केलेले पालन यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडून फैलावाला आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनीही पुढील काळात देखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा व कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर शासकीय रूग्णालय, कोविड केअर सेंटर आदी ठिकाणी चांगल्या उपचारामध्ये असलेल्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी नियंत्रणाचे तहसीलदारांना अधिकार दिले आहेत. तसेच जिल्ह्याबाहेरुन बीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना सक्तीचे विलगीकरण ठेवण्याची व्यवस्था केली आहे. कोविड उपचारांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही केली आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागात पदे भरण्यात येत असून या प्रक्रियाद्वारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने नियुक्त केले जाणार आहेत.

या सर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर काही चांगल्या घटना देखील घडत आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. देशात लॉकडाऊन करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील जवळपास दीड लाख ऊसतोड मजूर बांधव राज्यात आणि राज्याबाहेर विविध ठिकाणी अडकलेले होते. त्या सर्व ऊसतोड मजूर बांधवांना त्यांच्या स्वगृही परत आणण्यात आम्हाला यश आले. हे स्थलांतर देशातील सर्वात यशस्वी स्थलांतर ठरले आहे.

सर्व कोविड योद्धा कोरोनाच्या संकट काळात आपले वैयक्तिक आयुष्य विसरून जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असून आरोग्य, पोलीस, स्वछता आदी क्षेत्रात कोविड योद्धा म्हणून काम करत असलेल्या सर्व बंधू- भगिनींना सुरक्षेची प्रार्थना करत आहे.

कोरोना कालावधी शासनाची लोकहिताची भूमिका असून जिल्ह्यात विक्रमी कापूस खरेदी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणासाठी १७ लाख ७१ हजार विमा अर्ज नोंदणी, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या दोन लाख खात्यांवर १२२४ कोटी रुपये जमा केले आहेत. यासह शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शासन सतत प्रयत्न करत आहे.

जिल्ह्यातील इयत्ता ११ वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यात देखील कोरोना संसर्गाच्या काळात अतिशय चांगले काम झाले आहे. हे ॲप राज्यातील सर्व ११ वी १२ वी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले आहे.

सन २०२० हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी मागणी करत त्यासाठी पाठपुरावा करत आहे.

या सर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर काही चांगल्या घटना देखील घडत आहेत त्या महत्त्वाच्या आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिेक्षेत जिल्ह्यातील गुणवंतांनी बीड जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. गुणवंतांच्या पाठीशी उभे राहण्याची शासनाची कायम भूमिका राहीली आहे. जिल्ह्यात ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात आय टी आय पासून पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना फायदा झाला आहे. गोरगरीब आणि गरजूंसाठी राज्यात “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती. या योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत करण्यात आला आहे.

सध्या आपत्ती असून देखील जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागाचा विकासाचा वेग वाढलेला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून यावर्षी सर्वसाधारणमध्ये ३०० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ९२ कोटी व ओटीएसपी १ कोटी ७४ लाख रुपयांचा आराखडा मंजूर होता. परंतू कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनापुढचे प्राधान्यक्रम बदलले असून आरोग्य विषयक अनुषंगिक बाबींसाठी निधी दिला जात आहे. सध्या जिल्ह्यास या कालावधीत ३३ टक्के प्रमाणे १३१ कोटी मंजूर असून ३४ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

इथल्या तरुणांना इथेच रोजगार उपलब्ध होतील, उच्च शिक्षणापासून ते वैद्यकीय सुविधांसाठी मोठ्या शहरात जायची गरज थांबावी, जिल्ह्यातील लाखो ऊसतोड मजुरांचे जीवनमान उंचावून त्यांची कौटुंबिक व आर्थिक प्रगती व्हावी, विकसित जिल्ह्यांच्या यादीत अग्रस्थानी नेण्यासाठी विकासाच्या दिशेने वाटचाल करु असा विश्वास आहे.

0000

शब्दांकन : किरण वाघ, माहिती अधिकारी, बीड


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता