धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. औषधोपचारासाठी राज्य शासन निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र,  या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करीत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना अंमलात आणण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, खार विकास जमिनी, बंदरे, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

कोरोना विषाणूच्या (COVID19) आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार काशिराम पावरा, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार डॉ. फारुक शाह, उपमहापौर कल्याणी अंपळकर, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, डॉ. दीपक शेजवळ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कोरोना विषाणूबाधित रुग्णासह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला औषधापचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले पाहिजे. रुग्ण पाठविताना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोबाईलवरुन संबंधित रुग्णालयाला पूर्व सूचना द्यावी. जेणेकरुन रुग्णावर वेळेत उपचार करता येतील. रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा करणाऱ्यांविरोधात तत्काळ कार्यवाही करावी. साक्री येथे ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था तातडीने कार्यान्वित करावी.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिक मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसत नाही. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. त्यासाठी पोलिस दलाची मदत घेत गुन्हे दाखल करावेत. याशिवाय जे विक्रेते मास्क, सोशल डिस्टन्सिंग किंवा राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नाही, अशांवरही कारवाई करावी. आवश्यकता भासल्यास त्यांचे परवाने रद्द करावेत.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर औषधोपचार करताना काही खासगी रुग्णालये अवाजवी बिल आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींच्या निराकरणासाठी महानगरपालिकेने पथक गठित करावे. तसेच रुग्णालयांतील उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना होण्यासाठी ॲप कार्यान्वित करावे. याशिवाय रुग्णालयातील उपलब्ध सोयीसुविधांची माहिती महानगरपालिकेने ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

धुळे तालुक्यातील नेर येथे रुग्ण संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर  तेथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात कोरोना विषाणूबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध साधनसामग्रीची पडताळणी करून घ्यावी. वाढती रुग्ण संख्या पाहता श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार केले जात आहेत. नॉन कोविड व प्रसूतीसाठी स्वतंत्र रुग्णालय तत्काळ कार्यान्वित करण्यात येईल. अवाजवी बिलांची तपासणी करण्यात येईल. तसेच नागरिकांनी तक्रार नोंदविल्यास तत्काळ दखल घेण्यात येईल, असे सांगितले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी नॉन कोविड रुग्ण, प्रसूतीसाठी स्वतंत्र रुग्णालय कार्यान्वित करावे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा करावा, स्वॅबचे अहवाल निर्धारित कालावधीत मिळावेत, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच थांबावे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधसाठा ठेवावा, सर्पदंशावरील लसीचा साठा असावा आदी मागण्या केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. रंधे, आमदार श्री. पावरा, आमदार श्री. पाटील, आमदार श्रीमती गावित, आमदार डॉ. शाह, उपमहापौर श्रीमती अंपळकर यांनी भाग घेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता