नंदुरबार दि. १५ : जिल्ह्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रशासन चांगला प्रयत्न करत असून नागरिकांनी नियमित मास्क लावणे, साबणाने नियमित हात धुणे, शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ॲड.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. एकाचवेळी ७५० बाधितांच्या उपचाराची सुविधा करण्यात आली आहे. महिला रुग्णालयाच्या नूतन इमारतीत १०० रुग्णांना ऑक्सिजन आणि ५० रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा असणार आहे.

कोरोना संकटाच्या परिस्थितीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान देण्याचा निर्णय नुकताच मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आल्याने अनुसूचित जमातीच्या ११ लाख ५५ हजार लाभार्थी कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे.

महत्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत ४० हजार नागरिकांचा नव्याने समावेश, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत २१ हजार मे.टन तांदळाचे मोफत वाटप, मनरेगाच्या माध्यमातून ६४ हजार नागरिकांना रोजगार, आदिवासी विभागातर्फे धान्य वाटप आदी माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रातही चांगली कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात बेघरांना घरकुल देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही  ते म्हणाले. कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करताना अर्थव्यवस्थेला गती देण्याचेही प्रयत्न आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी शिथीलता देण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि निश्चय केल्यास येत्या काळात कोरोनावर यशस्वीपणे मात करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

कुपोषणाला जिल्ह्यातून हद्दपार करणार

जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायमचे दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी महिला रुग्णालय उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. महिला रुग्णालय आणि  आरपीटीपीसीआर लॅबच्या उद्घाटन  प्रसंगी ते बोलत होते.

ॲड.पाडवी म्हणाले, गेल्या काही वर्षापासून महिला रुग्णालयाचे काम सुरु होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे काम अंत्यत वेगाने पुर्ण करण्यात आले आहे. आरपीटीपीसीआर लॅबमध्ये अंत्यत आधुनिक यंत्रणा असून कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक स्वॅब चाचणी कमी वेळेत करणे सुलभ होणार आहे.

एका‍ दिवसात 1200 स्वॅबची चाचणी होणार असून विभागात सर्वात चांगली यंत्रसामुग्री जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी कमी वेळेत तोडणे शक्य होऊ शकेल. कोरोना नियंत्रणासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी चांगली कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला रुग्णालयाच्या  वरच्या मजल्याचे कामही करुन ते परिपूर्ण हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. धडगाव, अक्कलकुवासारख्या भागात वैद्यकीय अधिकारी जाण्यास तयार नसतात अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधाचा विकास करण्यावर अधिक भर देण्यात येईल. अशा दुर्गम भागात ब्लॅड स्टोअरेज युनिट उभारण्यात येईल. तसेच महिला रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन युनिट उभारण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. वैद्यकीय महाविद्याय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ.गावीत म्हणाल्या, जिल्ह्यातील माता मृत्यू दर  आणि कुपोषण कमी करण्यासाठी महिला रुग्णालय महत्वाचे आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी आरटीपीसीआर लॅब आणि कोविड हॉस्पिटल उपयुक्त ठरेल. जिल्हा आरोग्य यंत्रणेने वेगाने कोविड हॉस्पिटल व लॅबची सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन केले.

श्रीमती वळवी यांनी कोरोना नियंत्रणसाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

महिला व बालविकास भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषद परिसरातील महिला व बालविकास भवनाचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हा  महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषदेचा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ यांची कार्यालये एकाच छताखाली आणून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देणे सोयीचे होण्यासाठी हे भवन कार्यान्वित करण्यात आले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी बापूराव भवाने यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले व भवनाविषयी माहिती दिली.


सोर्स महासंवाद
ही बातमी गुगल न्यूज वर वाचा https://ift.tt/3fgNrMG या लिंक वर क्लिक करून , येथे आम्हाला फॉलो करू शकता