कोडिंगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या ई-उपस्थितीत राज्य शालेय शिक्षण विभाग आणि Amazon Future Engineer Initiative and Leadership for Equity या दोन संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा आणि एकात्मिक अभ्यासक्रमाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले जाईल.
पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद या नऊ जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू होत असून एक लाख विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगार मिळवून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.