रयत शिक्षण संस्था, सातारा.
प्रथम सत्र परीक्षा 2023 - 24
इयत्ता: ७ वी | वेळ: २.३० तास | विषय: मराठी
विभाग 1 - गद्य
१. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
_______________________________________
एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्यांचा गाडगी, मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावांतल्या बाजारात विकायला नेई. गाढवाचा पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत. ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून दोन तीनदा आपले वडील कुठेतरी बाजारात जातात. हे लहानग्या गजाननला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत.
_______________________________________
अ) सूचनेनुसार कृती करा.
१) सदाच्या मुलाचे नाव -
२) सदाचा व्यवसाय-
ब) खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द उताऱ्यातून शोधून लिहा.
१) एका गावात सदा व ________ नावाचे जोडपे राहत होते.
२) कधी कधी एखाद्या बाजारात ______ शिल्लक राहत असत.
क) दिलेल्या शब्दांचे लिंग बदलून शब्द पुन्हा लिहा.
१) मुलगा- ________
२) आई-________
ड) तुम्ही पाहिलेल्या आठवडे बाजाराचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
२. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
_______________________________________
गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचारानं सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा अन् शंकरला उमगलंच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैलं शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या, बाप्या माणसांनी बैलं अन् पोरांनी बादल्या, कळश्या घेतल्या व नदीवर गेली. दामूनंही आपली बैलं नदीवरुन पाणी पाजून आणली. मीरा अन् वसंतनं दिल्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. 'आवं पाबूंदा सोडा, लक्ष्मीनं दिलेला आवाज दामूनं ऐकला आणि पाचूंदा सोडून गुडध्यानं सरमंड कडाकडा सोडून बैलांसमोर सारंल, तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपआपल्या परीनं बैलांसमोर सरड मोडून टाकलं. पिठलं-भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंधरुणं पसरली.
_______________________________________
अ) पुढील आकृतीत योग्य शब्द लिहा.
१) बैलांचे खाद्य-___________
२) पाच पेंड्यांची एकत्रित बांधलेली मोळी-____________
ब) शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले ?
1. मीरा, वसंत: _______
2. वामू:________
क) खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
१) मनात काहूर उठणे-
ड) ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांबद्दल तुम्हांला काय वाटते ते लिहा.
विभाग २- पद्य
३. दिलेली कविता काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
_______________________________________
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पड़े. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे । झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे, तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पड़े. उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते, उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती, खिलारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे. सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला | सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना हर्ष माइगा हृदयात वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
_______________________________________
अ) पुढील तक्ता पूर्ण करा.
कवितेत आलेली यांची नावे
1. प्राणी: ________
2. फुले: _______
ब) चौकटी पूर्ण करा.
१) देवदर्शनाला निघालेल्या: _________
2) फुले पाने खुडणाऱ्या: _ ________
३) गाणी गात फिरणारा: _________
४) स्त्रियांच्या चेहन्यावर लिहिलेले:__________
क) पहिला पाऊस आल्यावर काय घडते ते लिहा.
विभाग ३ व्याकरण
१) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्यरूप लिहा.
अ) रमेशचा भाऊ शाळेत गेला.
२) कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा. व वाक्य पुन्हा लिहा.
(विराजमान होणे, सगेसोयरे)
अ) आज शाळेतील जेष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर ............
ब) संत तुकारामांनी वृक्षांना ............ संबोधून त्यांचा गौरव केला.
३) दिलेल्या वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यय ओळखून त्याचा प्रकार लिहा.
अ) आज मी मावशीकडे गेलो होतो.
ब) रमेशचे घर शाळेच्या पलीकडे आहे.
४) खालील शब्दांना अर्थ लिहा.
अ) नखशिखान्त-
ब) आपादमस्तक-
५) खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा.
अ) पण
ब) म्हणून
६) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखून लिहा.
अ) मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे.
ब) रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते.
७) खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करून लिहा.
(कोणतेही दोन )
अ) धोरणी
ब) भाषा
क) आण
विभाग ५ उपयोजित लेखन
५. पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा आणि संवादलेखन करा.
६. खालीलपैकी एका विषयावर तुमचे मत अनुभव लिहा.
१) स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
२) माझा शाळेतील पहिला दिवस
७. तुमच्या मित्राचा /मैत्रिणीचा तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला आहे.
त्याचे / तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.