Teacher Recruitment: इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना राखीव कोटा ठेवण्याचा शासन निर्णय निघाल्यामुळे शिक्षक भरतीच्या उमेदवारांमध्ये सध्या असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे. मराठी भाषेमधून बीएड व डीएड करणाऱ्या शिक्षकांवर या परिपत्रकाद्वारे अन्याय होत आहे.
इंग्रजी माध्यमातील (English Medium) पदवीधरांना डीएड व बीएड करणाऱ्यांना यामुळे झुकते माप देणारे परिपत्रक असल्याचे आणि हे परिपत्रक रद्द करण्याचे उमेदवारांची मागणी आहे. जर असेच इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना झुकते माप देणारे जीआर शासनाने काढले तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा उमेदवारांनी दिला.
सध्या केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून पवित्र पोर्टल द्वारे भरती केल्या जाणाऱ्या शिक्षकाचे डीएड किंवा दहावीपर्यंतचे बारावीपर्यंतचे माध्यम इंग्रजी असावे, अशी अट लागू करण्यात आलेली आहे. अलीकडे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यासारख्या शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्याचे हालचाली सुरू आहेत. मात्र पवित्र पोर्टल द्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी इंग्रजी माध्यमाची सक्ती का? असा प्रश्न उमेदवार करत आहेत.
१३ ऑक्टोंबर रोजी निघालेल्या परिपत्रकानुसार केंद्र शाळा स्तरावर आणि अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवता यावे यासाठी इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. सरकारच्या या पावलामुळे राज्यभरात सुमारे 4500 हून अधिक पदे इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना जाणार आहेत आणि त्यामुळे मराठी माध्यमातील उमेदवारांवर अन्याय होणार आहे. (Shikshak Bharati)