अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे बैलगाडा शर्यतीवेळी भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आणि ते यात किरकोळ जखमी झाले आहेत.
याप्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यामागे राजकीय हात असल्याचा संशय अनिल बोंडे यांनी व्यक्त केला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी माहिती दिली की, भाजप उपाध्यक्ष रविराज देशमुख यांच्याकडून तिवसा येथे राज्यस्तरीय किसान शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत शनिवारी सायंकाळी ५ वाजता बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. दरम्यान, भाजप खासदार अनिल बोंडे हेही बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आले होते. यावेळी काही अज्ञातांकडून अनिल बोंडे यांच्यावर अचानक दगडफेक करण्यात आली. बराच वेळा कोणालाच काही समजत नव्हते त्यावेळी अनिल बोंडे यांच्यावर मागून दगडफेक करण्यात आली. दरम्यान, पाठीवर व डोक्यावर दगड लागल्याने ते किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, अनिल बोंडे यांनी तिवसा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर यामागे कोणा राजकीय हात आहे का?, हे पाहणार असल्याचे सांगितले. बैलगाडा शर्यतीत काहींनी दंगा घालण्याचा प्रयत्न केला आहे. अखेर ही दगडफेक करणारी टोळी कोणाची? हे शोधून काढावे लागेल. काही लोक आमच्या गावाची बदनामी करत असतील तर त्यांना सांभाळून घ्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.