रेणुका शुगर्सने 3300 रुपयांची दरवाढ जाहीर केल्याने कोल्हापूर सीमाभागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पंचगंगा कारखान्याकडून दरवाढीची पहिली उचल जाहीर करण्यात यावी यासाठी आज शेतकरी संघटनेकडून ठिय्या मांडला होता. त्यानंतर कारखान्याने उचल जाहीर केली.
पंचगंगा साखर कारखान्यावर स्वाभिमानी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सागर संभुशेटे यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर ठिय्या आंदोलन केले. त्याचबरोबर शेतकरी संघटनेने परिसरातील सर्व ऊस तोडणी थांबवली होती. आंदोलन केल्यानंतर 3300 रुपयांची रेणुका शुगर्स प्रशासनाने पहिली उचल जाहीर केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात 23 नोव्हेंबर रोजी शिरोली पुल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 9 तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर, जिल्हा अधिकार्यांनी मागील आंदोलनापेक्षा 100 रूपये आणि चालू हंगामात अधिक 100 रूपये FRP (वाजवी आणि लाभदायक किंमत) म्हणून जाहीर केले. त्यामुळे पहिली उचल बहुतांश साखर कारखान्यांनी जाहीर केली. मात्र, पंचगंगा साखर कारखाना यावर्षी केवळ एफआरपी देऊ शकतो. 3194 रुपये एफआरपीप्रमाणे दर देण्याची भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली होती.
आज, स्वाभिमानी युवा आघाडीचे सागर संभुशेटे यांच्या नेतृत्वाखाली ऊस तोडी बंद करण्यात आले. पंचगंगा साखर कारखान्यांनी ठरल्याप्रमाणे एफ आर पी अधिक शंभर रुपये अशी पहिली उचल द्यावी जर उचल दिली नाही तर कारखाना चालू करू देणार नाही अशी घोषणा करण्यात आली आणि कारखान्यातील व्यवस्थापकीय कार्यालयातच आंदोलन सुरू करण्यात आले.
3300 पहिली उचल न दिल्यास यापेक्षा अधिक उग्र आंदोलन करू आणि बेमुदत आंदोलन सुरू करत इशारा दिला. रेणुका शुगर्स ने नमती भूमिका घेत उच्चांकी 3300 पहिली उचल जाहीर केले. कारखान्याकडून एफ आर पी पेक्षा 106 रुपये अधिक दर देण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लेखी पत्र मुख्य शेती अधिकारी सी एस पाटील यांनी दिले. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे.