Maharashtra Election 2024 Date: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी (दि. १५ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबरला जारी केली जाईल, तर उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी २९ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल. अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होईल आणि अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असेल.
महाराष्ट्रातील ९.६३ कोटी मतदार
महाराष्ट्रातील निवडणुकीत ९.६३ कोटी मतदारांचा सहभाग असणार आहे. यामध्ये ४.९७ कोटी पुरुष आणि ४.६६ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील २०.९३ लाख नवीन मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघांत एकाच दिवशी मतदान होणार आहे. तरुण मतदारांमध्ये २० ते ३० वयोगटातील मतदारांची संख्या १.८५ कोटी इतकी आहे.
सणांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा विचार
आगामी दिवाळी (२९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर), छट पूजा आणि देव दिवाळी या सणांच्या अनुषंगाने मतदानाची तारीख (Election Date) ठरवण्यात आली आहे. हिंदी पट्ट्यातील मतदार छट महोत्सव आणि देव दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरे करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या गावात जाऊन येण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी निवडणुकीच्या तारखांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा दिवाळी २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान साजरी होईल, तर छट पूजा ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान आहे. देव दिवाळी १५ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे.
प्रचारासाठी कमी वेळ
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे २८ नोव्हेंबरपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येईल. लोकसभा निवडणुकीसारखाच विधानसभेसाठी देखील प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये उमेदवारांची निवड, प्रचाराचे नियोजन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा तीव्र होणार आहे.
मागील निवडणुकांचा इतिहास
Maharashtra Election Date: २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात झाल्या होत्या. २०१४ मध्ये मतदान १५ ऑक्टोबरला झाले होते, तर २०१९ मध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. यावेळी सणांमुळे निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुका
हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. निवडणूक प्रक्रिये दरम्यान कुठेही हिंसाचार झाला नाही आणि सर्वत्र शांतता टिकून राहिली, याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या राज्यातील मतदारांचे आभार मानले.