6G technology in India: भारताची दूरसंचार क्षेत्रातील प्रगती आता 6G तंत्रज्ञानाच्या दिशेने वेगाने होत आहे. यामध्ये सिंगल ब्रॉडबँड तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच अँटेनामधून सर्व बँड्स चालवण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले गेले आहे. आत्तापर्यंत नेटवर्कच्या वेगवेगळ्या बँडसाठी स्वतंत्र अँटेना लागायचे, परंतु या प्रकल्पामुळे एकाच अँटेना द्वारे सर्व बँड कव्हर होणार आहेत.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मल्टी-पोर्ट स्विचच्या माध्यमातून एकाच अँटेना प्रणाली तयार करणे आहे, ज्यामुळे उपकरणांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि वापरकर्त्यांना वेगवान नेटवर्क सेवा मिळेल. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR) आणि दूरसंचार विभाग (DoT) चे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अँटेना विकसित केला जात आहे. मायक्रो-इलेक्ट्रोमेकॅनिकल तंत्रज्ञानाचा वापर करून अँटेना अनेक बँड एकाचवेळी कव्हर करण्यास सक्षम असेल.

भारताच्या 6G व्हिजन अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पावर काम सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. 6G संशोधनासाठी दोन नेक्स्ट जनरेशन टेस्टबेडसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे आणि 6G साठी आलेल्या 470 प्रस्तावांचे पुनरावलोकन सुरु आहे. पंतप्रधानांनी भारताने 2030 पर्यंत 6G क्षेत्रात एक प्रबळ शक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करावी, असे उद्दिष्ट ठेवले आहे.

6G पेटंट फाइलिंगमध्ये भारत जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. 5G नेटवर्कच्या जलद अंमलबजावणीनंतर आता भारत 6G संशोधन आणि पेटंट फाइलिंगमध्येही पुढे येत आहे. सरकारी पॅनेलच्या अंदाजानुसार, पुढील तीन वर्षांत भारत 6G पेटंटचा 10% हिस्सा मिळवू शकतो.

भारताच्या या नव्या तंत्रज्ञानात्मक योजनेमुळे देशाला जागतिक पातळीवर नव्या युगात प्रवेश मिळणार आहे.